पिंपरी : बेकायदा गर्भपात करणारे म्हैसाळ (मिरज) येथील रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले. गर्भपातावेळी एका महिलेचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आली आणि खळबळ उडाली. त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात सर्वत्रच गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. या आदेशाला अधीन राहून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने शहरातील या केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरात २३६ सोनोग्राफी केंद्र आहेत. ४०७ रुग्णालये आणि १४० गर्भपात केंद्र आहेत. या केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत नुकतीच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. महापालिका हद्दीत पाच वर्षांपूर्वी जनवादी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी थेरगावातील एका डॉक्टरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. एवढेच नव्हे, तर एका बड्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई झाली होती. गर्भलिंग निदान चाचणीस कायद्याने प्रतिबंध असताना, काही डॉक्टर नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मात्र अशी काही घटना शहरात उघडकीस आली नाही. परंतु मिरज येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. अशा केंद्रांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याने वैद्यकीय विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. (प्रतिनिधी)
सोनोग्राफी केंद्रांवर पालिकेची नजर
By admin | Updated: March 16, 2017 01:54 IST