युगंधर ताजणे पुणे : आईचे दूध हाच नवजात बाळांकरिता सर्वोत्तम पोषण आहार. मात्र सध्या बाळाच्या जन्मानंतर मातेच्या शरीरात दुधाची वाढ कमी होणे यामुळे बाळाला जन्मल्यानंतर सर्वाधिक गरजेचे असलेले दूध मिळत नाही. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होताना दिसून येतो. मात्र मागील दोन वर्षांपासून ससूनमध्ये राबविण्यात येणाऱ्या मातृदूध संकलन पथकाच्या माध्यमातून १४३७ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. याप्रकारच्या अभिनव उपक्रमामुळे गरजू लहान बाळांच्या दुधाची अडचण दूर होत असून, याकरिता शहरातील वेगवेगळ्या भागातील महिला स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.सध्या ससूनमध्ये रोज ३ ते ४ लिटर दूध संकलित केले जाते. त्यानंतर त्या दुधावर प्रक्रिया केली जाते. पाश्चराईज्जड केलेल्या दुधाचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालानुसार ते दूध गरजेनुसार नवजात बालकांना दिले जाते. हे दूध जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत टिकते. त्यासाठी ते डीप फ्रीजरमध्ये ठेवले जाते. ससूनमध्ये ५९ एनआयसीयू बेड असून, त्यातील नवजात बालकांना संकलित केलेले दूध दिले जाते. याबरोबर ससूनच्या आवारात असलेले सोफोश अनाथालयातील बाळांकरितादेखील हे दूध महत्त्वाचे ठरते. त्यांना साधारण २00 ते ५00 मिली दूध दिले जाते. याविषयी अधिक माहिती देताना बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग चिकित्साशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, की मिल्क बँक या उपक्रमाला ४ तर नुकत्याच नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या मिल्क बँकेला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. एनआयसीयूच्या बाळांना हे दूध दिले जाते. या उपक्रमात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभते. यात इंटर्नशिप करणारे डॉक्टर विद्यार्थी, नर्सेस यांचा सहभाग आहे. आपल्याकडे अद्याप दूधसंकलन आणि ते दूध बाळाला देणे याविषयी महिलांच्या मनात भीती दिसून येते. ती कमी करण्यासाठी महिलांना समुपदेशनाचे काम केले जाते. अनेक महिलांना त्यांच्याकडे दुधाचे प्रमाण पुरेसे असतानादेखील केवळ भीतीपोटी त्या दूध डोनेट करण्यास टाळाटाळ करतात. काहींच्या मनात या नवीन संकल्पनेबद्दल शंका पाहवयास मिळते. अशा वेळी त्यांना उपक्रमाची योग्य माहिती देऊन दूध संकलनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरते.1नुकतीच जन्मलेल्या बाळांना दिवसाला २ ते ५ मिलीपर्यंत दुधाची गरज असते. तर सर्वसाधारण बाळाला २0 ते ३0 मिलीपर्यंत दूध लागते. ज्या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण जास्त आहे अशा महिलांना दूधसंकलनाकरिता प्रोत्साहित केले जाते.2अनेकदा त्यांना या दूध संकलनाविषयी पुरेशी माहिती नसल्याने ते दूध वाया तर जाते. शिल्लक राहिलेल्या दुधाच्या स्तनात गाठी तयार होतात. यामुळे अशा महिलांना स्तनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यामुळे दुधाचे प्रमाण जास्त असलेल्या महिलांना उत्तेजन देऊन त्यांचा दूधसंकलनाकरिता उत्साह वाढविला जातो.
बालकांना मातृ‘दुधा’ची संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 07:05 IST