पिंपरी : जखमी अवस्थेत कासारवाडीत आढळून आलेल्या सतीश हरिभाऊ बुचडे (वय ३५) या गृहस्थाचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा गळा दाबून खून केला असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने युद्धपातळीवर तपास यंत्रणा कार्यान्वित केली. २४ तासांच्या आत पथकाने आरोपींचा शोध लावला. बांधकाम साइटवर रखवालदाराचे काम करणाऱ्यांनी हा खून केल्याचे उघडकीस आले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, खून झालेल्या सतीशचे त्यांच्याशी भांडण झाले होते. सतीश बुचडे हे फिरस्ता होते. कोठेही राहण्याचे निश्चित ठिकाण नव्हते, नेहमी ते भटकंती करायचे. कासारवाडीत एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या रखवालादारांकडे ते नेहमी जायचे. दारू पिऊन त्यांच्याशी हुज्जत घालायचे. असेच भांडण त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी झाले. करण भोरमप्रताप सिंग (वय २३), कोमलसिंग रामगोपाल कोटार (वय २२) या आरोपींनी त्याला लाकडी बांबू व पट्टीने मारहाण केली. डोक्यात, शरीरावर जखमा, तसेच गळा दाबून खून केला. कासारवाडीतील रखवालदाराला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने एका साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)
चोवीस तासांत आरोपी गजाआड
By admin | Updated: August 10, 2016 01:08 IST