न्हावरे : आंबळे येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जनआरोग्य मंचाचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर नारायण बेंद्रे (वय ४२) यांचे शनिवार (दि. २४) कऱ्हाडनजिक झालेल्या अपघातात निधन झाले.डॉ. बेंद्रे यांना सायकलने प्रवास करण्याची विशेष आवड होती. काही दिवसानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुणे ते गोवा असा सायकलने प्रवास करणार होते. दरम्यान त्यांच्या सरावासाठीच डॉ. बेंद्रे कऱ्हाड (जि. सातारा) पर्यंत निघाले असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. डॉ. बेंद्रे यांनी या अगोदर मनाली, लडाखपर्यंत सायकलने प्रवास केला होता. त्यांना ट्रेकिंगचीदेखील विशेष आवड होती. पुणे येथे ते मानव क्लिनिक नावाचे रुग्णालय चालवित होते. विशेष म्हणजे आठवड्यातून एक दिवस ते आदिवासी भागात जाऊन रुग्णांवर मोफत उपचार करत असत. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते. त्यांनी लिहिलेले पार्टनर हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजले. या नाटकाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. बेंद्रे हे शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांचे बंधू होत.
चंद्रशेखर बेंद्रे यांचे अपघाती निधन
By admin | Updated: December 26, 2016 02:36 IST