मंचर : सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून दागिने लंपास करणाऱ्या भामट्यांनी मंचर पोलिसांनाच आव्हान दिले आहे. आठवड्यात अशा प्रकारची परिसरात दुसरी घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात निघोटवाडी येथे अशी फसवणूक झाल्यानंतर गुरुवारी कळंबला पुन्हा तसाच प्रकार घडला आहे. या टोळीचा जिल्ह्यात वावर वाढत असून, आतापर्यंत अशा पाच-सहा घटना घडल्या आहेत. ‘लोकमत’ने या चोरीबाबत वृत्त प्रसिद्ध करीत ग्रामस्थांनी काय काळजी घेतली पाहिजे, याबाबतही पुढाकार घेतला आहे; मात्र अशा चोऱ्या वाढत असून, चोरटे मात्र पोलिसांच्या हाताला लागत नसल्याने मोठे आव्हान निर्माण केले आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथून अज्ञात दोन तरुणांनी सोन्याची बोरमाळ, कानातील फुले अशी ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केली आहेत. ही घटना कळंब गावच्या हद्दीतील ४२ मैल येथे सकाळी घडली. याप्रकरणी दोन तरुणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.निघोटवाडी येथे नुकताच दागिने लुटण्याचा प्रकार घडला होता. असाच काहीसा प्रकार घडला आहे. गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शिल्पा भालेराव त्यांची सासु, आजी व नणंद यांच्यासह घरामध्ये असताना एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून अंदाजे २५ ते २७ वयाचे दोन इसम त्यांच्या दारात आले. ते शिल्पा यांना म्हणाले की, आमच्याकडे काचा, खिडक्या साफ करायचे लिक्विड आहे, असे म्हणून ते घरामध्ये आले व त्यांनी घरातील देव्हाऱ्यातील भांडी साफ करून दाखविली. त्यांनी जुनी चांदीची अंगठी साफ करून दाखवली. शिल्पा यांनी अर्धा तोळे वजनाची कानातील सोन्याची फुले तसेच त्यांची आजी सासू यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची बोरमाळ साफ करण्यासाठी दिली. त्यांनी लाल रंगाची पावडर स्टीलच्या डब्यात टाकली तुमचे सोने ५ मिनिटांत तुम्हाला देतो, असे सांगून हात धुण्याचे निमित्त साधून त्यांनी नजर चुकवून पोबारा केला.
भामट्यांचे पोलिसांना आव्हान
By admin | Updated: February 11, 2017 02:44 IST