चाकण : वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना येथील तळेगाव चौकात शनिवारी (दि.३०) घडली. दोन अरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक नम्रता आत्माराम डावरे (वय ३० रा.चाकण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रवींद्र नामदेव करवंदे (वय ३०) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर रोहित बाबू साळवी (वय २०,रा. सम्राट अशोक बिल्डिंग जवळ, रेल्वे स्टेशनसमोर, कल्याण, ठाणे), हर्षदीप भारत कांबळे (वय २२, रा. नंदिवली इस्ट, कल्याण, ठाणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रवींद्र करवंदे हे
चाकणच्या तळेगाव चौकात वाहतूक नियमन करत होते. यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. यावेळी एकाने करवंदे वाहतूक नियमन करत असताना पाठीमागून त्यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. करवंदे खाली कोळसताच दोन्ही हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पळून जाणाऱ्या दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.
बाचाबाचीतून केला हल्ला
चाकणच्या तळेगाव चौकात गर्दीत कंटेनर मागे घेण्यावरून आरोपींची आणि वाहतूक पोलीस कर्मचारी करवंदे यांच्या झालेल्या बाचाबाचीवरून हल्ला केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे.
फोटो - जखमी वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे.