पुणे : एफटीआयआयच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त सेल्युलर जेलची प्रतिकृती उभारून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. ‘सेल्युलर जेल’ हे नाव उच्चारले तरी मृत्यू साक्षात् उभा राही. अंदमानाच्या बेटावर बांधलेल्या याच कारागृहात स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांना बंदिस्त करून त्यांना अघोरी शिक्षा दिली जात असे. या कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काय काय अमानुष अत्याचार केले गेले, याचा इतिहास सर्वश्रुत आहेच! हे स्वातंत्र्य आपल्याला सहजपणे मिळालेले नाही, त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्या स्वातंत्र्यसैनिकांची ‘जरा याद करो कुर्बानी’ असा संदेश देणारी एफटीआयआयच्या मुख्य दरवाजासमोरील ‘सेल्युलर जेल’ची प्रतिकृती पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रांतिकारकांना कोलूला जुंपणे, एका लोखंडी शिडीला बांधून चाबकाचे फटके देणे अशा अघोरी शिक्षा स्वातंत्र्यसैनिकांना भोगाव्या लागल्या आहेत. सेल्युलर जेलमधल्या या अमानुष प्रसंगांना देखाव्याच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. हा देखावा पाहणाऱ्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून निघत आहे. एफटीआयआयसमोरून जाणाऱ्या प्रत्येकाची पावले इथे थांबत आहेत. अनेक जण मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही प्रतिकृती बंदिस्त करीत आहेत. एफटीआयआयचे विभागप्रमुख आशुतोष कविश्वर, कला दिग्दर्शनाचे विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रॉडक्शन डिझाईन विभागाने या सेल्युलर जेलचे स्ट्रक्चर निर्मित केले आहे.
‘सेल्युलर जेल’ने दिली दाहक वास्तवाची प्रचिती
By admin | Updated: January 28, 2017 01:18 IST