लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : वाढदिवस साजरा करण्याचे विविध फंडे आजकाल अवलंबले जातात. मित्र व कुटुंबात जेवणावळी, केक कापण्याचा सार्वजनिक सोहळा, फ्लेक्सबाजी, पर्यटनाला जाणे, महागड्या वस्तूंची खरेदी केली जाते. पण या सर्व प्रकाराला फाटा देत सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी आश्रमातील मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
गराडे येथील साई चिल्ड्रन आश्रमातील मुलींसोबत त्यांनी वाढदिवस नुकताच साजरा केला. या मुलींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे यंत्र, तसेच फळे भेट दिले. या वेळी नगरसेवक अजित जगताप, एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सामजिक कार्यकर्ते मोहनअण्णा जगताप, पाणीपुरवठ्याचे सेवानिवृत्त अधिकारी माउली गिरमे, बँक ऑफ इंडियाचे हेमंत ताकवले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दादा भुजबळ उपस्थित होते. आश्रमातील मुलींनी स्वागत गीत गाऊन व औक्षण करून चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आश्रमाच्या प्रमुख पावित्री पंडित (माई)यांनीही चव्हाण यांच्या या संकल्पनेचे स्वागत करत त्यांना व मित्रांना धन्यवाद दिले.
फोटो : पुरंदर तालुक्यातील गराडे येथील आश्रमात वाढदिवस साजरा करताना मोहन चव्हाण. सोबत मुली आणि मित्र परिवार.