पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होणारच असे गृहीत धरून पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षाकडून जागांचे वाटप होऊन उमेदवार प्रचारालादेखील लागले आहेत. परंतु आता ब्रेकअपनंतर दोन्ही पक्षांना काही तालुक्यांमध्ये उमेदवारांची शोधा-शोध करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात मावळ आणि शिरूर तालुका सोडले तर अन्य कोणत्याही तालुक्यात भाजपची फारसी ताकद नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वांधिक १३ जागा शिवसेनेच्या असल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु मुंबईमध्येच दोन्ही पक्षांच्या युती घोडे अडले अन् संपूर्ण राज्यातील युतीला खोडा बसला. जिल्ह्यात शिवसेना-भाजपाची युती तुटल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी जिल्ह्यातील नेते व इच्छुक उमेदवारांची निवडणुकीची गणिते बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दोन्ही पक्षांनी पक्षाचे प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाबाबत चर्चा होऊन काही जागांवर उमेदवारांना कामाला लागण्यास सांगण्यातदेखील आले आहे. परंतु आता युती तुटल्याने दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेच्या ७५ जागा आणि पंचायत समितीच्या १५० जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. काँगे्रसने यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रस सोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी चौरंगी लढत होणार असून, शिवसेना-भाजपा युतीतील बिघाडा कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जागावाटपानंतर ब्रेकअपमुळे शोधावे लागणार उमेदवार
By admin | Updated: January 28, 2017 00:13 IST