वासुंदे : दौंड एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षाची दूरध्वनी सेवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नागरिकांना वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येत नाही. दौंड आगाराकडून चौफुला-पाटस-बारामती अशी एसटी ची ठराविक अंतराच्या वेळेवर शटल सेवा सुरु आहे. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर ज्या एसटी बसेस धावत आहेत त्यांच्या वेळाही अनियमित आहेत. यामुळे या मार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.होणाऱ्या गैरसोईबाबत दौंड आगार व्यवस्थापकांकडे या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांनी अनेक वेळा या मार्गावर पुरेशा व नियमीत वेळेवर एसटी बस सोडणेबाबत विनंती करुनही टाळाटाळ होत आहे. याचाच परिणाम म्हणून शनिवार (दि.३) रोजी वासुंदे येथे प्रवासी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी या शटल सेवेतील एक एसटी बस रोखून धरल्याचा प्रकार घडला. तर पाटस व वरवंड येथेही एसटी मध्ये बसण्यास पुरेशी जागा मिळत नसल्याच्या कारणावरुन अनेक वेळा गोंधळ उडाला आहे.असे प्रकार या मार्गावरील एसटीच्या अनियमीत व अपुऱ्या फेऱ्यांमुळे अनेक वेळा या मार्गावर उद्भवत आहेत. १९ डिसेंबर रोजी २०१४ रोजी वरंवड येथील बसस्टँन्डवर विद्यार्थ्यांना गाडीत बसण्यास जागा न मिळाल्याने काही विद्यार्थी एसटीच्या खिडक्यांना लोंबकळल्याने खिडकी निखळून पडल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ४दौंड आगारातील दुसऱ्या क्रमांकावर फोन केला असता नियंत्रण कक्षातील फोन बंद असल्याचे सांगितले. तसेच, एसटी सोडण्याचे नियोजन हे आगारप्रमुखांकडून केले जाते, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले. यावर आगारप्रमुख विलास गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ४दौंड आगाराकडून या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या अडचणीबाबत माहिती घेण्यासाठी दौंड आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (०२११७-२६२३३४) या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा दूरध्वनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
बसस्थानक नॉट-रिचेबल
By admin | Updated: January 8, 2015 23:11 IST