मांडवगण फराटा : सातबारावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांची लाच घेताना वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी शिवराम सखाराम मिरे (वय ५८) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.वडगाव रासाई येथील भगिरथ पोपट परभाणे (वय ३५) यांनी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे २७ फेब्रुवारी रोजी वडगाव रासाईचे मंडलाधिकारी शिवराम मिरे २० हजार लाचेची मागणी करत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. भगिरथ परभाणे यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीची आणेवारी, तसेच सात बारा व आठ ‘अ’च्या उताऱ्यावर आपल्या नावाची नोंद करण्यासाठी वर्षभरापूर्वी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. तो सुमारे ६ महिन्यांपासून वडगाव रासाईचे मंडलाधिकारी मिरे यांच्याकडे प्रलबिंत होता. त्या अर्जावर कारवाई करण्यासाठी मिरे याने परभाणे यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ परभाणे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल मंगळवारी सापळा लावला होता; परंतु मिरे कार्यालयास हजर झाले नसल्याने एसीबीच्या पथकास माघारी जावे लागले होते; पंरतु आज बुधवारी दुपारी १.२०च्या सुमारास या पथकाने वडगाव रासाई येथील मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावून मंडलाधिकारी शिवराम मिरे यास परभाणे यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पोलीस हवालदार दशरथ चुंचकर, सुनील शेळके यांनी वरील कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत करीत आहेत. (वार्ताहर)
लाच घेताना मंडलाधिकाऱ्यास अटक
By admin | Updated: March 4, 2015 23:40 IST