पुणे : आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला आता नोटाबंदीचाही फटका बसला आहे. पंजाबी बांधवांच्या सहकार्यामुळे केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून रक्कम घेण्याची गरज लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत या संमेलनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात येणारे २ कोटी रुपये नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासनाकडे वर्ग करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात आले असल्याचे सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी मंगळवारी सांगितले.पुण्यात दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान विश्व पंजाबी साहित्य संमेलन सोहळा रंगणार आहे. या संमेलनाच्या उत्तम नियोजनासाठी केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेने पुढाकार घेऊन संंमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच पहिल्या टप्प्यात आर्थिक निधीमध्येही सहभाग नोंदविला होता. केंद्राने २ कोटी रुपये, पंजाब सरकारसह राज्य सरकार व महापालिकेकडून अनुक्रमे २५ लाख रुपये देण्यात येणार होते. मात्र, निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने अडचण आली आहे.त्यामुळे संमेलनाची आर्थिक गणितेही काहीशी विस्कटली आहेत. संमेलनाचे अडीच कोटीचे बजेट १ कोटी २० लाखांवर आले आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख रुपयांची तूट भासत आहे. मात्र या समंलेनाच्या यशस्विततेसाठी पंजाबी बांधवांनीच पुढाकार घेऊन रक्कम उभी केली आहे. त्यामुळे कदाचित संमेलनासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडून निधीची गरज भासणार नाही.पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात येणारे २ कोटी रुपये नांदेडच्या गुरूगोविंदसिंग अध्यासनाकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे. विद्यापीठाला निधीची गरज आहे, अशा आशयाचे विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांचे पत्रही त्याला जोडण्यात आले आहे. तसेच पंजाब सरकारनेही अमृतसर मधील गुरूनानक विद्यापीठातील नामदेव अध्यासनाला २५ लाख रुपये द्यावेत, अशी विनंती केली आहे.एका धनाढ्या व्यक्तीने १ कोटी देण्याची आॅफर केली होती. काळा पैसा संमेलनाला अशी भूमिका घेऊन आयोजकांनी आर्थिक अडचणीत असतानाही ती आॅफर नाकारली. (प्रतिनिधी)
विश्व पंजाबी संमेलनाला नोटाबंदीचा फटका
By admin | Updated: November 16, 2016 02:19 IST