पुणे : पीएमपीकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार, ठेकेदारांची तब्बल १० कोटी रुपयांची थकीत बिले न दिल्याने शुक्रवार (दि. ६) पासून पुन्हा ब्रेकडाऊनची घोषणा करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी बंद मागे घेतला. ही थकीत रक्कम शुक्रवार दुपारपर्यंत देण्याचे आश्वासन पीएमपीकडून देण्यात आल्यानंतर हा ब्रेकडाऊन मागे घेण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा निधी देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले असून, त्यानंतर निधी न मिळाल्यास दुपारी १२ नंतर बस बंद करण्याबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सातव यांनी स्पष्ट केले. थकीत रक्कम न मिळाल्याने बस चालक काम थांबवतील, अशी माहिती पीएमपीला बस पुरविणारे ठेकेदार महालक्ष्मी आॅटोमोटिव्हचे नितीन सातव यांनी दिली होती. त्यानंतर तातडीने महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेकेदारांची बैठक घेऊन शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व थकीत देणे देण्याचे आश्वासन दिले. सणासुदीच्या काळात पुणेकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे. पीएमपीची डिसेंबर महिन्याची संचलन तूट देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे. त्यानुसार, उद्या सकाळी धनादेश मिळताच ठेकेदारांची बिले दिली जातील. त्यानुसार, ठेकेदारांकडून उद्या ब्रेकडाऊन केला जाणार नाही. तसेच प्रश्नांबाबतही लवकरच तोडगा काढला जाईल. - अभिषेक कृष्णा (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
ब्रेकडाऊन तूर्त टळला
By admin | Updated: November 6, 2015 03:10 IST