पुणे : सिंहगड रस्त्यासह सनसिटी रस्त्यावर ९० वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलिसांनी पकडून दिल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला रविवारी न्यायालयामध्ये हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पिंगळे यांनी ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या तरुणाचे ब्रेनमॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे.अमन अब्दुलगनी शेख (वय ३२, रा. साई पॅलेस, ५५/७, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत लक्ष्मण बडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी, आनंदनगर आणि नऱ्हे परिसरात ८४ दुचाकी आणि ६ चारचाकी वाहनांना त्याने आग लावली होती. लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे यांच्या माहितीवरून स्वारगेटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेख याला ताब्यात घेतले होते.वाहने पेटवण्याचे साहित्य कोठून आणले, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात १९९७ व २००६ यावर्षी वाहन जाळपोळीचे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याला हा गुन्हा करण्यासाठी कोणी उद्युक्त केले, तसेच गुन्हा करण्यापूर्वी त्याने कोणती पूर्वतयारी केली होती का? त्याने डॉमिनोज पिझ्झा, सूर्यनगरी बिल्डींग, स्वामी नारायण अपार्टमेंट, अक्षय ग्लोरी अपार्टमेंट, अवधुत आर्केड, राम हाईट्स येथीलच वाहने का पेटवली याच्या तपासासाठी तसेच वैज्ञानिक तपासण्या (उदा. ब्रेन मॅपींग, लाय डिटेक्टर) करण्यासाठी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.
जळीतकांड प्रकरणात आरोपीचे ब्रेनमॅपिंग
By admin | Updated: July 6, 2015 05:34 IST