पुणे : बिबट्याची कातडी घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथे अटक केली़ त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीची कातडी जप्त केली आहे़ चंदन ताराचंद महेर (वय ३४) आणि रमेश आसाराम सपकाळ (वय ३०, दोघेही रा़ म्हैसमाह, ता़ खुलताबाद, जि़ औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़या दोघांकडून जप्त केलेली कातडी ही बिबट्याचीच असल्याचे वनक्षेत्रपाल साबळे यांनी सांगितले असून, कातड्यावरून हा बिबट्या साधारण अडीच वर्षांचा असावा व त्याची चार महिन्यांपूर्वी हत्या करून हे कातडे काढले असावे, असे त्यांनी सांगितले़ या कातड्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी सांगितले़ दोघे जण बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एम़ बी़ मोरे यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी आपले सहकारी व्ही़ बी़ साळुंके, एस़ व्ही़ मोरे, एस़ जे़ शिलेदार, मयूर वाडकर, धोंडे यांनी पिंपळवडी, कांदरी फाटा दरम्यानच्या कुकडी नदीवरील पुलाजवळ सापळा रचला़ आज दुपारी सव्वादोन वाजता मोटारसायकलवरून दोघे जण येत असल्याचे त्यांनी पाहिले़ त्यांना थांबवून त्यांच्याजवळील प्लॅस्टिक गोणीची तपासणी केली असता त्यात बिबट्याचे कातडे आढळून आले़ या प्रकरणी शरद वाबळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)ही कातडी प्रयोगशाळेकडे तपासणी करण्यासाठी पाठवली आहेत. या दोघांनी बिबट्याची कोठे व कधी हत्या केली, ते ही कातडी कोणाला विकणार होते,याविषयी पोलिसांनी चौकशी केली असता ते वेगवेगळी उत्तरे देत आहेत़ दोघांचीही पोलीस कोठडी घेऊन त्याविषयी अधिक तपास करण्यात येणार आहे.- राम जाधव, पोलीस निरीक्षक
बिबट्याची कातडी विकणाऱ्या दोघांना अटक
By admin | Updated: January 22, 2015 23:20 IST