पुणे : पीएमपीच्या तब्बल साडेअकरा कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस यंदाही लटकण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने ठेवायचा की पीएमपीने याबाबत निर्णय होत नसल्याने या वर्षीही कर्मचाऱ्यांना वेळेत बोनस मिळणार का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. बोनससाठी पीएमपीकडून महापालिकेकडे तब्बल साडेअठरा कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेकडून पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा बोनस हा इतर निधीच्या स्वरूपात देण्यात येतो. त्यातच पीएमपीला दोन दिवसांत २७ कोटी रुपये महापालिकेकडून देण्यात येणार असल्याने स्थायी समिती आणखी १८ कोटींची रक्कम देणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विषय महापालिकेकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणताही प्रस्ताव ठेवण्यात आला नाही. या वेळी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता, पीएमपीला नुकताच २७ कोटींचा धनादेश देण्यात येणार असून, आता आणखी १८.५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
बोनस यंदाही लटकणार?
By admin | Updated: October 28, 2015 01:36 IST