पुणे येथे झालेल्या संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या बैठकीत या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र ठरल्यानंतर सदर उमेदवाराला पुन: पुन्हा परीक्षा देण्याची गरज नसल्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला.
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण या संस्थेच्या कार्यकारणीमध्ये पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील संस्थाचालक प्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये नव्याने गुंजवणे शिक्षण संस्था, भोर या संस्थेचे अध्यक्ष, विक्रम काशिनाथ खुटवड व नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव संग्राम अशोकराव मोहोळ यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांतील रिक्त जागांची भरती करणे, २० टक्के अनुदानास पात्र शाळांना मूल्यांकन करून अनुदान देणे, शासकीय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेत आदा करण्यात यावी, या मागण्यांसाठी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे निवेदन देण्यात यावे, अशा सूचना संस्थेचे उपाध्यक्ष, खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अॅड. देवेंद्र साहेबराव बुट्टे-पाटील यांनी केली.
बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशमामा खोमणे, खजिनदार श्रीप्रकाश बोरा, सचिव मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, सहसचिव महेश ढमढेरे, महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळाचे पुणे विभागीय अध्यक्ष आप्पासाहेब बालवडकर व कार्यकारिणीचे सर्व सभासद हजर होते.