पुणे : लेखी इतिवृत्त आले नाही म्हणून अहवाल सादर केला नसल्याचे उत्तर स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाºयांकडून देण्यात आले. यावर नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले. स्थायी समिती महापालिकेची प्रमुख समिती आहे. त्यामुळे या समितीमध्ये देण्यात आलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी बैठकीच्या लेखी इतिवृत्तीची वाट पाहण्याची गरज नाही, असे सांगत अहवाल ठेवण्यास दिरंगाई करणाºया अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.राव यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. बैठकीत जलतरण तलावाच्या ‘सेफ्टी आॅडिट’च्या विषयावरून जोरदार चर्चा रंगली. तळजाई येथील जलतरण तलावात तरुणाचा मृत्यू झाल्याने तलावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तलावांच्या ‘सेफ्टी आॅडिट’चा अहवाल मांडण्याची मागणी सदस्यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र, या बैठकीत अहवाल मांडण्यात आला नाही. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार मंजूषा नागपुरे यांनी केली. त्यावरून नागपुरे आणि उगले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादात राव यांनी मध्यस्थी करत अहवाल का मांडला नाही, अशी विचारणा केली. तेव्हा, समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानेराव यांनी अधिकाºयांना कडकशब्दांत सूनावले.स्थायी समितीही महापालिकेतील प्रमुख समिती आहे. त्यात एखाद्या विषयावर चर्चा झाल्यानंतर आणि समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर लेखी माहितीची वाट पाहण्याची गरज नाही, असे अधिकाºयांना सुनावले.बंद दरवाजे उघडले, भिंतीही झाल्या चकाचकआयुक्त सर्व विभागात येणार असल्याचे कळताच अनेक विभागप्रमुखांची धावपळ उडाली. महापालिकेच्या बहुतांश विभागप्रमुखांच्या कार्यालयांचे दरवाजे दुपारी तीननंतर बंद असतात. बाहेर बसलेले शिपाई नाव आणि आतील साहेंबाना विचारूनच आतमध्ये प्रवेश देतात. मात्र, राव येणार असल्याचे कळताच अनेक अधिकाºयांनी आपले शिपाई दुसरीकडे पाठवत कार्यालयांचे दरवाजे पूर्ण उघडले होते. तसेच आपण बाहेरून पाहिल्यावर सहज दिसू अशा पद्धतीने आपली आसनव्यवस्था ठेवली होती. तर मुख्य इमारतीच्या अनेक भिंतींवर मोठ्या प्रमाणात स्टिकर तसेच भित्तीपत्रके चिटकविण्यात आलेली होती. गेली अनेक वर्षे लावलेली ही भित्तीपत्रके दिसतही नव्हती. मात्र, आयुक्तांनी पाहिल्यास अडचण नको म्हणून अनेक विभागांचे कर्मचारी दुपारनंतर ही भित्तीपत्रके काढत होते. तसेच भिंत कशी स्वच्छ दिसेल, याची काळजी घेताना दिसत होते.राव, राजे आणि कॅडबरीमहापालिका आयुक्त सौरव राव यांना महापालिकेतील आपल्या पहिल्याच दिवशी भले मोठे कॅडबरी चॉकलेट मिळाले व तेही खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून. राव यांची पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याचे समजल्यावर उदयनराजे यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. खास त्यांच्यासाठीच आणलेली भलीमोठी कॅडबरी दिली. माझे तुमच्याकडे काहीच काम नाही, मात्र, जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही चांगले काम केले आहे, आता आयुक्त म्हणून पुण्यातही चांगले कराल, असे म्हणाले.
पालिकेच्या नूतन आयुक्तांचा दणका, पहिल्याच बैठकीत घेतले अधिकाऱ्यांना फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 05:25 IST