जेजुरी : जेजुरीनजीक साकुर्डे येथील शेतकरी अशोक बाजीराव जाधव (वय ५८) यांचा साकुर्डे-तक्रारवाडी रस्त्यावर हरभऱ्याच्या शेतात दगडाने ठेचून व तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला़ ही घटना शनिवारी (दि़ ७) रात्री ९ ते सकाळी ७़३०च्या दरम्यान घडली असावी, असा पोलिसांचा कयास आहे़ त्यातूनही सर्वांत दुर्दैवी व धक्कादायक बाब म्हणजे अशोक जाधव यांच्या मध्य वस्तीत असणाऱ्या घरावर पाच वर्षांपूर्वी दरोडा पडून ते त्यांची पत्नी व मुलगा यांना जबर मारहाण करण्यात आली होती़ रुग्णालयात उपचार होत असताना त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता़ पोलिसांना या प्रकरणात आरोपी गजाआड करण्यात व तपासात अपयश आले होते़ या घटनेबाबत अशोक बाजीराव जाधव हे गृहमंत्री, मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार भेटून दरोडा व पत्नीच्या खुनाचा तपास लावून आरोपी गजाआड करण्याचे आवाहन व लेखी निवेदनाद्वारे मागणी करीत होते़ पाच वर्षांनंतर अशोक जाधव यांचाच खून झाल्याने जाधव परिवार व ग्रामस्थ दहशतीच्या छायेत आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, भोर उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गौड, पुणे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षण राम जाधव जेजुरी सहा़ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली़ वैधानिक प्रयोग शाळेतील ठसेतज्ज्ञ व श्वानपथक बोलाविण्यात आले होते. घटनास्थळी हरभऱ्याच्या शेतात रक्ताने माखलेली फरशी, दगड व सायकलची चेन मिळून आली़ पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़पाच वर्षांपूर्वीचा सामूहिक हत्येचाच प्रकार दिसून येत होता़ त्यातून अशोक जाधव व प्रसाद जाधव सावरले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची पत्नी निर्मळा यांचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी कसून तपास केला़ मात्र, आरोपी सापडले नाहीत़ ग्रामसभेत ठराव करून व आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने पुणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग झाला़ अशोक जाधव यांचा सैन्यदलात असलेला मुलगा गावाकडे सुट्टीवर आला, की पोलीस ठाण्यात जाऊन तपासाबाबत माहिती घेत असे. अशोक जाधवही पोलिसांशी सतत संपर्क करून तपास लावून आरोपी शोधण्याची मागणी करीत असत़ (वार्ताहर)
साकुर्डेत शेतकऱ्याचा निर्घृण खून
By admin | Updated: February 8, 2015 23:19 IST