नेहरूनगर : दुचाकीच्या पेट्रोल टाकीत साखर टाकल्याच्या संशयावरून मंगेश महिपत कदम (वय २४, रा. वाघेरेवाडा, नेहरूनगर, पिंपरी) या तरुणाचा खून केल्याची घटना नेहरूनगर येथील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेजवळील भारत आर्यन सिंडीकेट कंपनीच्या मागील प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश कदम व अल्पवयीन आरोपी हे दोघे मित्र होते. परंतु, गणेशोत्सवादरम्यान मंगेशच्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीत दोन वेळा साखर आढळली होती. याबाबत मंगेशला आरोपीवर संशय होता. यामुळे काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता.दरम्यान, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास मंगेश घराबाहेर गेला होता. साडेबाराच्या सुमारास आरोपी व मंगेश यांची प्रियदर्शनी शाळेजवळील भारत आर्यन सिंडिकेट कंपनीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ बाचाबाची झाली. यानंतर आरोपीने मंगेशच्या छातीत व पाठीत तीक्ष्ण हत्याराने वार करून पसार झाला. मंगेश जखमी अवस्थेत वाघेरेवाडा येथील घरी आला. घरात मंगेशची आई मंदा कदम होत्या, तर त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात येताच मंगेश बेशुद्ध पडला. यानंतर मंगेशचे मित्र व नातेवाइकांच्या मदतीने त्याला तातडीने चव्हाण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. मंगेशचे वडील चिंचवड येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. महिपत कदम गेल्या २० वर्षांपासून वाघेरेवाडा येथील एका छोट्या खोलीत रहावयास आहेत. मंगेशवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, ऐन घटस्थापनेच्या दिवशीच हा प्रकार घडल्यामुळे वाघेरेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूर मोहम्मद शेख, सहायक पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, हरिष माने आदींनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.(वार्ताहर)
नेहरुनगर येथे तरुणाचा खून
By admin | Updated: September 27, 2014 07:31 IST