कोरेगाव भीमा: शंभूछत्रपतींनी स्वराज्यासाठी एक महिना यातना सहन करून फाल्गुन अमावस्येला आपल्या प्राणाचे बलिदान दिले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्मरण म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील शंभूराजांच्या समाधिस्थळावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व वढू बुद्रुक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३७० जणांनी रक्तदान करुन शंभूछत्रपतींना अभिवादन करत बलिदान मासाची सुरुवात केली.
यावर्षी क्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३२ व्या बलिदानमासाच्या निमित्ताने संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्ह्याच्या वतीने बलिदान मासाची सुरुवात म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गून अमावस्या म्हणजेच दिनांक १४ मार्च ते १२ एप्रिल २०२१ या महिन्यात पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत तसेच तालुक्यांमध्ये बलिदान मास पाळला जाणार आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांचे स्मरण म्हणून शेकडो धारकऱ्यांनी भीमा नदीच्या साक्षीने मुंडण केले. ३३२ व्या बलिदानमासाची सुरुवात श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरुर) येथील शंभूछत्रपतींच्या समाधिस्थळावर शिवप्रतिष्ठानचे धारकरी तसेच ग्रामस्थ व शंभूभक्तांनी अभिवादन करून रक्तदान करून यावर्षीचा बलिदान मासाची सुरुवात करण्याचा संकल्प सोडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा व श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान यज्ञ प्रत्येक वर्षी आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला असून पुढील वर्षी १००० च्या संख्येत रक्तदान करण्याचा संकल्प असल्याचे सांगण्यात आले. रविवारी ३७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास शंभू प्रतिमा भेट देण्यात आली.
१४ कोरेगाव भीमा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या शंभूभक्तांना शंभूप्रतीमा भेट देताना मान्यवर.