दौंड : भाजपाचे सरकार फसवे आहे. पंतप्रधान मोदी यांनी मासबंदी केली त्यानंतर नोटाबंदी केली तर भविष्यात नसबंदी करायलाही हे सरकार मागेपुढे पाहणार नाही. जनतेने ‘कमळाबाई’ला या निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.देऊळगावराजे (ता. दौंड) येथे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेला फसविण्यापलीकडे काहीही केलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात म्हणतात मी शेतकरी आहे. माझा त्यांना एक सवाल आहे. की तुम्ही जर गाईचं दूध काढून दाखवलं तर तुम्ही खरे शेतकरी आहात. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, की तालुक्याचे आमदार राहुल कुल हे गाजर दाखविण्यात पटाईत आहेत. भीमा पाटस कारखाना कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितसाठी सुरू व्हाव, ही आमची प्रबळ इच्छा आहे. मात्र कुल यांनी कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भीमा पाटस कामगार संघटेनेचे पदाधिकारी केशव दिवेकर म्हणाले की, कामगारांची परिस्थिती हालाखीची आहे. याला जबाबदार भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. यावेळी नंदू पवार, महेश भागवत, केशव दिवेकर, अरविंद जगताप, नरेश डाळिंबे, माऊली शेळके, पाराजी हंडाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपाचे फसवे सरकार भविष्यात नसबंदी करेल
By admin | Updated: February 18, 2017 02:33 IST