पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले तसेच भाजपाचे उमेदवार सतीश बहिरट या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले असून अपक्ष म्हणून नोंद करण्यात आली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपामध्ये येऊन तिकीट देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी विजया पांगारकर यांनी रात्री आठ वाजता हा निर्णय दिला़ रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला़ तोपर्यंत त्यांनी आॅनलाईन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरला होता़ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देण्याचे सोपस्कार करून घेतले व त्यांना भाजपचा ए व बी फॉर्म दिला़ या जागेवर अगोदर भाजपाने सतीश बहिरट यांना उमेदवारी जाहीर करून गुरुवारीच ए व बी फॉर्म दिला होता़ त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला़ त्यानंतर रेश्मा भोसले यांनी भाजपचा ए व बी फॉर्म घेऊन अर्ज दाखल केला़ पक्षाने भोसले याच आमच्या उमेदवार असल्याचे पत्रही त्यांना दिले होते़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी दुपारी ४ वाजता प्रभाग ७ डमधील अर्जाची छाननी सुरू झाली तेव्हा काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट व भाजपाचे उमेदवार सतीश बहिरट यांनी रेश्मा भोसले यांच्या अर्जाला हरकत घेतली़ तेव्हा भोसले यांच्या वतीने वकिलांनी म्हणणे मांडले़ सायंकाळी सात वाजता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली़ तेव्हा विरोधकांनी भोसले यांचा आॅनलाईन अर्ज हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भरला असून त्यात त्यांनी घड्याळ या चिन्हाची मागणी केली आहे़ तसेच तोच अर्ज त्यांनी सादर केला आहे़ तसेच त्यांनी पक्षाचे म्हणून सादर केलेल्या पत्राबाबतही हरकत घेतली़ त्यांनी आपल्यावरील गुन्हेगारीविषयीची माहिती दिली नसल्याचीही हरकत घेतली़प्रभाग ७ ड मध्ये कमळ चिन्हच नाहीरेश्मा भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज भरला असल्याने त्यांना भाजपाने दिलेले उमेदवारीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविले़ भोसले यांना भाजपाने अधिकृत उमेदवार ठरविले असल्याने सतीश बहिरट यांना एबी फॉर्मही रद्द ठविल्याने त्यांनाही भाजपाचे चिन्ह नाकारण्यात आले़ त्यामुळे प्रभाग ७ ड मध्ये कमळ चिन्हच राहणार नाही.
भाजपाचे भोसले, बहिरट दोघेही ठरले अपक्ष
By admin | Updated: February 5, 2017 03:50 IST