दौंड : सहकारक्षेत्रातील साखर कारखान्यांची लूट करणाऱ्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. राज्यातील जनतेसाठी शिवसेनेचा विधानसभेत भाजपला पाठिंबा आहे. परंतु, आता भाजपाला जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपाबरोबर युती होणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. दौंड येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्ये नाव न घेता ते म्हणाले, की पालकमंत्र्यांना पाणी काय आहे, हे माहीत आहे का? उगाचच मी पाणी सोडले, याचा बाऊ ते करीत आहेत.बारामतीकरांनी सहकारी साखर कारखाने डबघाईस आणून ते मातीमोल किमतीत घेण्याचे कामकाज केले आहेच; मात्र झुंजविण्याचे कामकाज त्यांनी नेहमीच राजकारणात केले आहे. दौंड तालुक्यातील भीमा-पाटस कारखान्याची वाट लावणाऱ्यांना दारात उभे करू नका, असे शेवटी शिवतारे म्हणाले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरदचंद्र सूर्यवंशी म्हणाले, की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशा उतरेल. वेळ आली तर शिवसेना तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढवेल, असे शेवटी सूर्यवंशी म्हणाले. बाबासाहेब धुमाळ, सत्यवान उभे, राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, आनंद पळसे, नरसेविका हेमलता परदेशी, नगरसेविका अनिता दळवी, सुजाता भुमकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपाबरोबर युती नाही : शिवतारे
By admin | Updated: January 25, 2017 23:58 IST