पाटस : भीमा-पाटस कारखान्याच्या इथेनॉल स्टॉकमध्ये १0 कोटींचा भ्रष्टाचार दिसत असून, याचा खुलासा कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी करावा, असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी उपस्थित केल्याने सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईल, असे राहुल कुल यांनी ठामपणे सांगितले. ताकवणे यांनी माफी मागावी, अन्यथा सभा सुरू होणार नाही, असा पवित्रा कुलसमर्थकांनी घेतल्यामुळे वातावरण तापले होते. मात्र, माफी न मागता निषेध करून नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, उद्योगपती विकास ताकवणे आणि भाजपाचे अन्य कार्यकर्त्यांनी सभात्याग केला. बँकेशी चर्चा करून ऊसाच्या भावाबाबत योग्य नियोजन केले जाईल, असे कुल यांनी स्पष्ट केले. भीमा-पाटस कारखान्याच्या कार्यस्थळावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून कारखान्याच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले असून, कारखाना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी सर्वांनीच सहकार्य केले, तसेच कायद्याच्या बाहेर जाऊन कारखान्याचे कामकाज केले नाही आणि करणार नाही, असे कुल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी अहवालवाचन केले. अहवाल वाचून वेळ वाया घालवू नका, चांगल्या विषयासाठी वेळ द्या, अशी मागणी करण्यात आली. कारखान्याचे माजी प्रशासन अधिकारी विश्वासराव शितोळे यांनी सभासदांच्या हितासाठी तीन अंकी दुसरा हप्ता काढावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना यापूर्वी दिवाळीला पैसे मिळाले नाहीत. चार अंकी आकडा जाहीर करा, अशी मागणी विकास ताकवणे यांनी केली. दर वेळेस सभासदांना काहीतरी देऊ म्हणता, मात्र काहीही देत नाही, असा आरोपही त्यांनी केला. (पान ८ वर)
भीमा-पाटस कारखान्याच्या सभेत प्रचंड गोंधळ
By admin | Updated: September 11, 2014 04:32 IST