लोणावळा : दहा दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी लोणावळ्यातील निसर्गरम्य धबधबे कोरडे पडले आहेत़ पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहणे बंद झाल्याने वर्षाविहारासाठी शनिवार व रविवारच्या सुटीनिमित्त लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांची घोर निराशा झाली.जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लोणावळा व मावळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने येथील सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले होते. भुशी धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’रूपी पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने मागील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात गर्दी झाली होती़ मात्र, त्यानंतर या भागात पावसाने दडी मारल्याने सर्व धबधबे कोरडे पडले आहेत़ दहा दिवसांपासून पाऊस न झाल्याने भुशी धरणाचा पाणीसाठा खाली गेल्याने धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहणे बंद झाले आहे़ यामुळे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी, धबधबे व धरणाच्या पायऱ्यांवर चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या पर्यटकांची मोठी निराशा झाली़ काही पर्यटकांनी धरणाच्या पायऱ्यांवरून बसून पाण्याच्या बाटल्या अंगावर ओतत वर्षाविहाराचा आनंद मिळविला़, तर काहींनी खोलगट भागात साचलेले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवीत वर्षाविहार केला़ पर्यटकांची संख्या रोडावल्याचा परिणाम या भागातील वडापाव व चहा विक्रेत्यांवर झाल्याने पर्यटकांप्रमाणे या विक्रेत्यांचीदेखील निराशा झाली़धबधबे आटल्याने पर्यटकांनी भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे न जाणेच पसंत केले़ हीच स्थिती भाजे व कार्ला लेणी परिसरातील धबधब्यांची होती़ पावसाने ओढ दिल्याने या वीकेण्डला लोणावळ्यातील पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले़ (वार्ताहर)
भुशी धरणाच्या पायऱ्या पावसाअभावी कोरड्या
By admin | Updated: July 6, 2015 05:01 IST