कोरेगाव भीमा : वाळू माफियांनी शिरूर तालुक्यात भीमा नदीचे पात्र अक्षरक्ष: पोखरले आहे. कोरेगाव भीमामध्ये तर नदीचा प्रवाहच बदलण्याची शक्यता आहे.यामुळे पावसाळ््यात पुराचा गावातील अनेक वस्त्यांना धोका संभवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वाळू माफियांना चिरडून टाका तसेच महसूलमंत्र्यांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करणार, असे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक महसूल प्रशासन ढिम्मच असल्याचे वास्तव आहे. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. कोरेगाव भीमामध्ये बालाजी एंटरप्रायजेस या नावाने शशिकांत ढमढेरे यांनी वाळूचा ठेका घेतला आहे. या ठेक्याचा ताबा देताना मंडलाधिकाऱ्यांनी सीमांकन करून देणे बंधनकारक असताना उपशाची सीमाच स्पष्ट होत नाही. त्यात खनिकर्म विभागाची कोणतीच परवानगी नसताना ठेकेदाराने नदीपात्रात वाळूचेच बंधारे घालून थेट पोकलेन व यांत्रिक बोटीच्या साह्याने बेकायदा वाळूउपसा सुरू केला आहे. नदीपात्राच्या मध्यापर्यंत वाळूचे ढिगारे निर्माण केल्याने नदीचा प्रवाह बदलून नदीपात्रालगत असणाऱ्या ऐतिहासिक अहिलेश्वर मंदिराला पुराचा धोका निर्माण तर होणार आहेच; शिवाय नदीपात्रालगत चर्मकारवस्ती, रामोशीवाडा, बौद्धवस्ती, समतानगर, पाटीलवाडा या वस्त्यांनाही पुराचा धोका निर्माण होईल. या संदर्भात ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतींनी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून महिना उलटूनही महसूल विभागाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी आपटी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली; परंतु या कारवाईसाठी कोरेगाव भीमामधूनच गेलेल्या महसूल विभागाला कोरेगाव भीमामध्ये अवैधपणे चाललेला बेकायदा वाळूउपसा दिसला कसा नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. तहसीलदार म्हणतात, पाहणी करतो...-या संदर्भात तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांनी शिरूरच्या तहसीलदारांना यावर कारवाई का करू नये; असे आदेश दिले असतानाही कारवाई होत नाही. याबाबत तहसीलदार राजेंद्र पोळ यांना विचारले असता वस्तूस्थितीची पाहणी करून कारवाईचे आदेश देवू असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भीमा नदी पोखरली!
By admin | Updated: June 17, 2015 22:33 IST