पुणे : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी पोहोचताच त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शनिवारी सुटी असल्याने दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी वाढली होती. भवानी पेठ आणि नाना पेठेत पालख्या थांबल्याने तेथे विविध वस्तू विकणारे रस्त्यावर स्टॉल लावून बसले होते. त्यामुळे या भागांना जत्रेचे स्वरूप आले होते. या पेठांबरोबर शहरात ठिकठिकाणी विसावलेल्या दिंड्यांमध्ये अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. आम्हा नामाचे चिंतन! राम कृष्ण नारायण!!तुका म्हणे क्षण! खाता जेविता न विसंभो!!म्हणोनि भिन्न भेद नाही! देवा आम्हा एकदेही!!नाही जालो काही एक एक वेगळे!!या अभंगाप्रमाणे आज पूर्ण पुणे भक्तिमय झाले होते. येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर गंध अन् मुखात हरिमान, माऊली, तुकाराम यांचा गरज... असे चित्र होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी रात्री उशिरा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पोहोचली, तर संत तुकाराममहाराजांची पालखी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात पोहोचली. पालख्या पोहोचण्याअगोदरच त्यांच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही मंदिरे फुलांनी सजविण्यात आली होती. रात्रीपासून पालख्यांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्या आज सकाळपासून वाढत गेल्या. सायंकाळपर्यंत या रांगा अडीच-तीन किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या. रांगेत दोन-तीन थांबूनही न थकता भाविक विठुरायाचे नामस्मरण करण्यात दंग झाल्याचे चित्र होते. दर्शनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता रांगांसाठी विशेष सोय करण्यात आली होती. वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकर तल्लीनसंत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या शहरात दाखल झाल्यापासून पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाले. विठ्ठलभेटीला जाता आले नाही तरी ‘साधू संत येति घरा... तोचि दिवाळी दसरा...’ हा भाव मनी ठेवून पुणेकरांनी वारकऱ्यांच्या चरणी सेवा अर्पण केली. नाना पेठ व भवानी पेठेसह शहरातील सर्वच भागांतील विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, भजनी मंडळांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. तसेच, अनेक कुटुंबांनी आपल्या परीने वारकऱ्यांना बिस्कीटे, चहा, फराळाचे पदार्थ देऊन त्यांची सेवा केली. अनेक मंडळांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. ‘माऊली... माऊली’ म्हणत वारकरीही पुणेकरांच्या या आदरातिथ्याचा स्वीकार करीत होते. तसेच नाभिकांच्या वतीने केस कापून व दाढी करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्तसंत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शहर पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना दर्शनासाठी रांगाची व्यवस्था करण्यात आली होती. यावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात होते. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी मनोरे उभे करण्यात आले होते. त्यावर उभे राहून दोन पोलीस कर्मचारी दुर्बिणीच्या साहाय्याने गर्दीवर नजर ठेवत होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून पालखी परिसरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.वाहतुकीमुळे भाविकांना त्रासनाना पेठ व भवानी पेठेत दर्शनासाठी जनसागर लोटला होता. मात्र, या भागातील काही रस्ते वाहनांसाठी बंद केली नसल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराजवळील मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली नसल्याने रस्ता ओलांडताना भाविक चाचपडत होते. पोलीस बंदोबस्त असून, त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले.
भवानी, नाना पेठेला जत्रेचे स्वरूप
By admin | Updated: July 12, 2015 01:45 IST