पुणे : वकीलसाहेब आजची तारीख नको, गुरुजींनी सांगितलंय आज केस आपल्यावर उलटेल... अहो साहेब, तिच्यावर कोणीतरी भानामती केलीय म्हणूनच ती नांदायला येत नाही... मुलांवर करणी केली असणार म्हणूनच ती भेटत नाहीत... लिंबू मिरची ठेवलीय बॅगेत, आज आपल्याच बाजूने निकाल लागेल... सकाळी नको, दुपारनंतर चांगला मुहूर्त आहे. त्यानंतरच युक्तिवाद करा... कौटुंबिक न्यायालयातील नानाविध कर्मकांडांनी पक्षकारांनाच पछाडलंय अशी परिस्थिती आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या धूसर रेषेला ओलांडून पक्षकार आपल्या खटल्यासाठी निरनिराळ्या कर्मकांडांना आंधळेपणाने सामोरे जातात आणि वकिलांनाही तसे करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सध्या ४,७३९ केसेस प्रलंबित आहेत. या केसेसमधील किमान ८५० अधिक केसेसमधील पक्षकारांच्या अंधश्रद्धेला कोर्टात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांना तोंड द्यावे लागते आहे. कौटुंबिक न्यायालयातील सुमारे १५-२० टक्के खटल्यांतील पक्षकार अंधश्रद्धेच्या अधीन होऊन खटल्याच्या सुनावणीकडे पाहत असतात. आपल्या खटल्याची चांगली सुनावणी व्हावी म्हणून काही पक्षकार आपल्या वकिलांना अंगारा, प्रसाद देतात. तर काही पक्षकार वकिलांना अंगारा जवळ ठेवण्यास सांगतात, असे अनेक अनुभव कौटुंबिक न्यायालयातील वकिलांना येतात, अशी माहिती पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितली.काही वेळा सामोपचाराने खटला मिटणार असेल, नात्यात सुधारणा येणार असेल तरीही पक्षकार कोणा साधूबुवाच्या वाणीवर विश्वास ठेवून चालतात आणि नातं मोडतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. वकील युक्तिवाद करत असतात, त्या वेळी न्यायालय कक्षात बसून काहीतरी पुटपुटत असतात. जपमाळ करीत असतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मात्र, जेव्हा अंगारा, गंडेदोरे, प्रसाद किंवा पंचांग, गुरुजींचे सांगणे यावर पुराव्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवायला लागतात तेव्हा मात्र वकिलांना याचा मानसिकरित्या त्रास होतो. यासाठी त्यांचे योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यांना श्रद्धा-अंधश्रद्धा यातील भेद पटवून देण्याची गरज आहे यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे कवडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पक्षकारांवर भानामतीचा पगडा
By admin | Updated: January 13, 2015 05:47 IST