लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णालयांमधील अपुऱ्या पडणाऱ्या ऑक्सिजनसहच्या खाटा, यामुळे पुणे महापालिकेने शहरातील तीन कोविड केअर सेंटर (सीसीसी) मधील दीडशे खाटाच आता ऑक्सिजनसह सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी या सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडर पोच झाले असून, येथील डॉक्टरांना तथा नर्सेस यांना त्याबाबतचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे़ त्यामुळे येत्या दोन दिवसात सीसीसीमध्येच दीडशे ऑक्सिजन बेड (खाटा) उपलब्ध होणार आहेत़
शहरातील खाजगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन खाटा ताब्यात मिळविण्यासाठी महापालिकेने, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्वांना आदेश दिले आहेत़ मात्र यास थंड प्रतिसाद किंबहुना आहे ते रूग्ण डिस्चार्ज होईपर्यंत खाटा मिळण्यास विलंब होत आहे़ दुसरीकडे सध्या शहरातील ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, सध्या शहरात केवळ ४ हजार ४७३ ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे़ त्यामुळे रूग्णांना बेड मिळणे सध्या कठीणप्राय झाले आहे़
या पार्श्वभूमीवर महापालिकेने जम्बो कोविड रूग्णालयातील क्षमता आज ६०० खाटांपर्यंत नेली असून, लवकरच ती ८०० पर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे़ तर दळवी रूग्णालयातही २०० खाटा कोविड-१९ साठी सज्ज करण्यात आल्या असून, यापैकी १८४ खाटा या ऑक्सिजनसह असून, उर्वरित व्हेंटिलेटरसह उपलब्ध करण्यात आल्या आहेत़
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीसीमधील ७० खाटा या मंगळवारपासून ऑक्सिजनसह कार्यरत होतील़ यामध्ये हडपसर येथील बनकर शाळेतील ३०, येरवडा येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात २० व रक्षकनगर येथे २० अशा ७० खाटांचा समावेश आहे़ लवकरच १५० खाटा या ऑक्सिजनसह सीसीसीमध्येच उपलब्ध करण्यात येणार आह़े यामुळे येथील रूग्णांना तात्काळ ऑक्सिजनची गरज लागल्यास सीसीसीमध्ये त्यांची सोय होणार असून, इतरत्र ऑक्सिजन बेडची शोधाशोध करण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी सांगितले़