पिंपरी : गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच आहे. जंगल वही रहेगा सिर्फ जंगल बदलेगा, या वॉर्डाचा अधिकृत उमेदवार, त्या वॉर्डाचा विश्वसनीय उमेदवार, अशा एक ना अनेक विजय घोषणा सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. त्याही उमेदवारी अर्ज निश्चित होण्यापूर्वीच. कारण, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर अनेक उमेदवार विजयाचे बाशिंग गुडघ्याला बांधून गावभर फिरत आहेत.यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत असे करमणूक घडविणारे प्रकार ग्रामस्थांना प्रथमच अनुभवास येत आहेत. कारण, प्रथमच गावांच्या राजकारणाच्या रणधुमाळीत सोशल मीडियाने उडी घेतली आहे. मात्र, त्याचा वापर कधी, कसा, किती करावा, याबाबत कोणतेच आडाखे नसल्याने भावी गावकारभाऱ्यांना आपल्या प्रसिद्धीचा मोह काही आवरेनासा झाल्याचेच वातावरण गावोगावी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गावच्या राजकारणापासून फारकत घेतलेल्या व पारावर बसणाऱ्या गावातील मुरलेले जुन्या पिढीतील मतदार पोरांच्या या कृतीला भावच देत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन पिढीतील पोरं आहेत, अशा हलक्या फुलक्या प्रतिक्रिया देऊन आता पुढे फक्त गंमत बघण्याचा उद््बोधक सल्ला ते देत आहेत. परंतु, निवडणुकीचा फिवर उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढला असून, काही जण प्रचाराच्या तयारीलाही लागले आहेत.(प्रतिनिधी)
निवडणुकीआधीच गुडघ्याला बांधले विजयाचे बाशिंग
By admin | Updated: July 23, 2015 04:47 IST