ओतूर : येथून जवळच असलेल्या नेतवड (ता. जुन्नर) येथे जमिनीच्या वादावरून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने शनिवारी दुपारी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून दोन आरोपींना ओतूर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती ठोण अंमलदार बी. सी. बेंद्रे यांनी दिली. यासंबंधी संदीप राजेंद्र ताम्हाणे ( वय ३४, रा. गोळेगाव, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेतवड (ता. जुन्नर) येथील नारायण धोंडिबा बटवाल यांचे घरासमोर शनिवारी (दि. २१) दुपारी ३ वाजता ही घटना घडली. संदीप राजेंद्र ताम्हाणे व विक्रम अंबादास बटवाल (वय ३२) यांचे जमिनीचे वाद असून त्यासंबंधी कोर्टात केस चालू आहे. संदीप ताम्हाणे नेतवडमध्ये आले असता विक्रम अंबादास बटवाल, पूनम विक्रम बटवाल (वय २९) यांच्यात बाचाबाची झाली. त्यात विक्रम बटवाल याने तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून हातातील कुऱ्हाडीने संदीप ताम्हाणे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला; पण तो हुकून खांद्यावर बसला. त्यात संदीपगंभीर जखमी झाले. ओतूर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. (वार्ताहर)
शेतकऱ्यावर कु-हाडीने हल्ला
By admin | Updated: February 22, 2015 22:51 IST