बावडा : सराटी (ता. इंदापूर) परिसरातील नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये बारामती पाटंबधारे विभागाकडून वेळीच बंधारे अडविले गेल्यामुळे सध्या हे बंधारे फुल्ल झाले आहेत. यामुळे या परिसरातील पाणीप्रश्न मिटला आहे. मागील ३-४ वर्षे दुष्काळाशी सामना करताना मेटाकुटीला आलेल्या शेतकरी वर्गात यंदा उशिरा का होईना परंतु मेघराजाने साथ दिल्याने दुष्काळी परिस्थिती मिटली आहे. बावडा व परिसरात रब्बी हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. उसाच्या लागणीही वाढल्या आहेत. या परिसरात सातत्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नीरा नदी कोरडी ठणठणीत पडली होती. मात्र, परतीच्या पावसाने ही कसर भरून काढून पावसाने या परिसरातील सरासरी पूर्ण केली. यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली. तसेच बंद पडलेल्या विंधनविहिरींनाही उभारी मिळाली. यंदा रब्बी हंगामातील ज्वारीपिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली असून, पिकेही समाधानकारक उगवली आहेत. काही भागात आंतरमशागतीची कामे सुरू झाल्याने शेतकरीवर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे बारामती उपविभागाचे उपअभियंता ए.आर. भोसले यांनी केले आहे. या उपविभागांतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये कालव्याचे पाणी मिळविण्यासाठी नमुना नं.७ वर ज्या पिकांना पाणी हवे असेल त्याबाबतचे मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात जमिनीचा सातबारा उतारा घेऊन व पाणीपट्टी थकबाकी भरून मागणी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन भोसले यांनी केले आहे. (वार्ताहर)
सराटी परिसरातील बंधारे फुल्ल
By admin | Updated: November 16, 2016 02:57 IST