पुणे : ताबडतोब हॉटेल बंद करा; अन्यथा हॉटेलवर कारवाई करीन, अशी धमकी देत मुंढव्यातील तीन हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला.
मिलन शंतनू कुरकुटे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हॉटेल व्यवस्थापक मारुती कोंडिबा गोरे यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेला कुरकुृटे हा २१ ऑगस्टपासून वैैद्यकीय कारणास्तव रजेवर होता.
मंगळवारी रात्री पोलीस गणवेशात स्वत:च्या चारचाकी गाडीतून मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये गेला. हॉटेल ताबडतोब बंद करा अन्यथा कारवाई करेन, अशी धमकी गोरे यांना दिली. कारवाई व्हायची नसेल तर दोन हजार द्या. जबरदस्तीने दोन हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर हॉटेल वन लॉज आणि एबीसी रस्त्यावरील हॉटेल कार्निव्हल अशा आणखी दोन हॉटेलच्या व्यवस्थापकांकडून अनुक्रमे दोन आणि तीन हजार रुपये अशी एकूण ७ हजार रुपयांची खंडणी कुरकुटेने घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कुरकुटेला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कुरकुटेने जामिनासाठी ॲॅड. अमेय डांगे यांच्यामार्फत अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी जामिनास विरोध करीत आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करायचे असल्याचे सांगत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ॲॅड. डांगे यांनी आरोपी पोलिसाकडून गणवेश, कार आणि रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पोलीस तपासास सहकार्य करण्यास तयार आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा असल्याचा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने साक्षीदारांवर दबाव न टाकणे आणि पोलीस स्टेशनला बोलावतील तेव्हा हजेरी लावणे या अटींवर कुरकुटेला जामीन मंजूर केला.