लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत असताना जिल्हा रुग्णालयासह सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रुग्ण, नातेवाईकांकडे मास्क असला तरी नाकाच्या खाली असतो, थर्मल गनद्वारे चेकिंग जवळजवळ बंद झाले, सॅनिटायझरचा वापर तर बंदच झाला, वार्ड सॅनिटायझेशनकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच विविध आरोग्य संस्था व तज्ज्ञांकडून ऑक्टोबरनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालये व सरकारी रुग्णालयांकडूनच कोरोना नियमांकडे पाठ फिरवली जात आहे. रुग्णालयात नाॅन कोविड रुग्णांची संख्या चांगलीच वाढली असून, ओपीडीतील बिना मास्क रुग्ण व नातेवाईकांची गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ शकते.
-------
रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
पुण्यातील ससून रुग्णालयात गेल्या काही दिवसांत नाॅन कोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. ओपीडी व रुग्णालयाच्या आवारात रुग्ण व नातेवाईकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाही. अनेक जण तर मास्कदेखील लावत नाही, मास्क असलेल्याचा बहुतेकांचा मास्क नाकच्या खाली असल्याचे निदर्शनास आले.
------
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे. त्यात कोरोना लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणारच नाही किंवा कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याने आता मास्क का वापरायचा, असे सांगत अनेक नातेवाईक मास्ककडे दुर्लक्ष करत असताना दिसले. यामध्ये काही रुग्ण देखील मास्क घातल्याने त्रास होतो म्हणून मास्क हनुवटीलाच लावून ठेवतात.
-------
ओपीडी हाऊसफुल्ल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ससून रुग्णालयातील नाॅन कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. परंतु आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नाॅन कोविड रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. ससून रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल्ल होऊ लागली आहे.
------
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना अनलाॅकमुळे लोक आता मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडल्याने डेंग्यू, मलेरियाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळेच ससून व शहरातील अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये देखील उपचारांसाठी येणारी रुग्णसंख्या वाढली आहे.
---- ------
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात असताना सरकारी रुग्णालयांमध्ये नाॅन कोविड रुग्णांची संख्या खूपच वाढली आहे. त्यात कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------