पुणे : बाजार समितीच्या मुख्यालयासमोर ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण खासदार सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले.
शिवाजी रस्त्यावरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर व त्यांना ४०० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरणे बाजार समितीने बंधनकारक आहे. परंतु ही भाडेवाढ अमान्य असल्याचे सांगत उपोषण सुरू केले होते. अखेर ते स्थगित केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना दूरध्वनी करून सविस्तर चर्चा केली. गरड यांनी डॉ. आढाव यांना भेटून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व चर्चा करण्यासाठी बाजार समितीच्या कार्यालयात बोलविले. या वेळी भाडे आकारणीबाबत नंतर चर्चा करू, सध्या उपोषण मागे घ्या अशी विनंती गरड यांनी केली. तर डॉ.आढाव यांनी आम्ही वाजवी भाडे द्यायला तयार आहोत, अशी चर्चा झाल्याची माहिती पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी दिली.