पुणो : शहरातील अनधिकृत व्यावसायिकांची माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे. हे व्यवसाय खासगी जागेत असल्याचे कारण पुढे करीत ही टाळाटाळ केला जात असल्याचे चक्क महापालिकेच्या शहर सुधारणा समितीतच समोर आले आहे.
मागील आठवडय़ात एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात एका दोनवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने समिती सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात भंगार व्यवसाय करण्यास महापालिकेकडून कोणतीही परवानगी दिली जात नाही. मात्र, अनेक झोपडपट्टय़ांमध्ये तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यांना पालिकेकडून परवानगी देण्यात येत नाही.
मात्र, त्यातील अनेक ठिकाणी स्फोटक तसेच अग्निजन्य पदार्थ वापरले जात असल्याने आगीच्या तसेच स्फोटाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने अशा व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांचे शहराबाहेर पुनर्वसन करावे तसेच अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव नगरसेवक अजय तायडे यांनी शहर सुधारणा समितीत दिला होता.
कारवाईबाबत सदस्यांनी विचारणा केली असता, हे व्यवसाय खासगी जागेत असल्याने कारवाई शक्य नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे प्रशासन चुकीची माहिती देऊन कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप समिती सदस्यांनी केला असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे समिती सदस्य तायडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
4प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात, शहरात सुमारे 373 भंगार व्यावसायिक असून, 125 जण अनधिकृतरीत्या व्यवसाय करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
4या वेळी महापालिका परवानगी देत नसतानाही, प्रशासनाने अधिकृत तसेच अनधिकृत कसे याबाबत समिती सदस्यांनी विचारणा केली असता, प्रशासनास काहीच उत्तर देता आले नाही.
4लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे समिती सदस्य अजय तायडे यांनी सांगितले.