पुणे : लग्नाला परगावी जाण्यासाठी आॅटो रिक्षाने शिवाजीनगर बस स्थानकाकडे प्रवास केला. मात्र, प्रवासाच्या गडबडीत या कुटुंबाची विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केली. या बॅगेमध्ये कपड्यांसह दोन तोळ्यांची सोनसाखळी व सोन्याची अंगठी होती. पोलिसांनी या रिक्षाचालकाचा सत्कार करुन त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवेझ नझीर शेख (वय ३५, रा. ६२/४८५ , महर्षीनगर) यांची पत्नी व मुले रविवारी गावाला निघाले होते. महर्षीनगर येथून त्यांनी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर ते शिवाजीनगर बस स्थानकावर उतरले. मात्र, नजरचुकीने त्यांची पर्स रिक्षाच्या पाठीमागील बाजूस विसरली. त्यामध्ये सोनसाखळी, पैंजण व सोन्याची अंगठी असा एकूण ८० हजारांचा ऐवज होता. पर्स विसरल्याचे साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी लक्षात आल्यावर त्यांनी परवेझ यांना फोनवरुन ही माहिती दिली. त्यांनी सोमवारी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पंडीत यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस नाईक हर्षद दुडम व पोलीस शिपाई दीपक मोदे यांना बोलावून रिक्षाचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी रिक्षाचा शोध सुरु केला. दरम्यान, रिक्षाचालक प्रदीप पांडूरंग ढापले (वय ३१, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना मंगळवारी रिक्षामध्ये पर्स मिळून आली. या पर्समध्ये कोणाचाही नाव पत्ता नसल्याने कोणी तरी शोध घेत येईल या आशेने पर्स घरामध्ये ठेवली. दरम्यान, पोलिसांनी रिक्षा थांब्याच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रिक्षाचा क्रमांक मिळाला. त्यावरुन रिक्षामालकाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी रिक्षा मालक गणेश मिसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही रिक्षा ढापले यांना दोन दिवसांपुर्वीच शिफ्टने चालविण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस ढापले यांच्या घरी पोचले. तेव्हा त्यांनी घरामध्ये ठेवलेली पर्स पोलिसांच्या ताब्यात दिली. पर्समध्ये कोणाचाही नाव पत्ता नव्हता त्यामुळे कोणाकडे पर्स द्यावी असा प्रश्न होता. आपण पोलिसांकडे जायचा विचारच करत होतो असे ढापले यांनी सांगितले. मंगळवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलावून ढापले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निरीक्षक (गुन्हे) पंडीत यांच्या हस्ते परवेझ यांना त्यांचा ऐवज सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस कर्मचारी हर्षद दुडम, दीपक मोदे, शकील शेख, रिक्षा मालक गणेश मिसाळ उपस्थित होते.
रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत परत केले सोन्याचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:06 IST
परवेझ नझीर शेख यांची पत्नी व मुले रविवारी गावाला निघाले होते. महर्षीनगर येथून त्यांनी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर ते शिवाजीनगर बस स्थानकावर उतरले. मात्र, नजरचुकीने त्यांची पर्स रिक्षाच्या पाठीमागील बाजूस विसरली.
रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत परत केले सोन्याचे दागिने
ठळक मुद्देस्वारगेट पोलिसांकडून चालकाचा सत्कार : कुटुंब भारावले