पुणे : स्मार्ट सिटीच्या आराखड्यामध्ये रोल मॉडेल म्हणून औंध, बाणेर व बालेवाडीचा काही भाग अशा एक हजार एकर परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रनिहाय सुधारणा योजनेअंतर्गत एका क्षेत्राची निवड करून केंद्र शासनाकडे पाठवायची आहे, त्याकरिता सर्वसंमतीने औंध, बाणेर व बालेवाडीच्या काही भागाची निवड करण्यात आल्याची घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.स्मार्ट सिटीअंतर्गत रोल मॉडेल म्हणून विकसित करायच्या भागाची निवड करण्याची शनिवारी महापालिकेत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला शहरातील सर्व खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीमध्ये औंध-बाणेर भागाची याकरिता निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवला होता. मात्र लोकप्रतिनिधींचे त्यावर एकमत न झाल्याने यावर सोमवारी निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट स्पष्ट केले होते. त्यानुसार या प्रस्तावाचा फेरआढावा घेऊन औंध-बाणेर भागाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले. धनकवडे म्हणाले, ‘‘औंध-बाणेर परिसरामध्ये झोपडपट्ट्या, नदीकिनारा, टेकड्या यांचा समावेश आहे. शहराला भेडसावणाऱ्या समस्या या भागात आढळून येतात. विकास आराखड्याची इथे चांगली अंमलबजावणी झाली आहे. नवीन विकासासाठी इथे संधी आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर औंध हे पुणे शहराचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या भागाचा रोल मॉडेल म्हणून विकास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण देशासमोर एक आदर्श उदाहरण देता येईल, असा या परिसराचा विकास केला जाईल.’’स्मार्ट सिटीमध्ये क्षेत्रनिवड करण्यासाठी रिडेव्हलपमेंट, न्यू डेव्हलपमेंट आणि रेट्रोफेक्ट्री हे ३ पर्याय देण्यात आले होते. त्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये जुन्या इमारती पाडून त्या भागाचा नव्याने विकास करता येणार होता. न्यू डेव्हलपमेंटमध्ये एखाद्या मोकळ््या जागेमध्ये नव्याने विकास करणे याचा समावेश होतो. रेट्रोफेक्ट्रीमध्ये या दोन्हींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
औंध-बाणेर ‘रोल मॉडेल’
By admin | Updated: October 27, 2015 01:09 IST