लोकमत न्यूज नेटवर्क
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने पाचव्या व शेवटच्या श्रावणी सोमवारी पायी आलेले व स्थानिक लोक वळगता मंदिर परिसरात फारशी गर्दी नव्हती. श्रावणी सोमवारनिमित्त देवस्थाने गाभाऱ्यात व सभामंडपात फुलांची आकर्षक सजावट केली होती.
श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पूर्ण एक महिना दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थानने केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी या भागात १४४ कलमदेखील लागू केले आहे. मात्र, तरीही कोकणातून पायी शिडीघाट, गणेशघाट चढून तसेच भोरगिरी, वांर्दे येथून लोक भीमाशंकरकडे आले होते. बसने देखील भाविक भीमाशंकरकडे आले होते. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांना बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागले. घोडेगाव पोलिसांनी डिंभे, पालखेवाडी व भीमाशंकर बसस्थानकाजवळ चेकनाके लावले आहेत. या ठिकाणी गाड्या अडवून त्यांना परत माघारी पाठवले. तरीही काही लोक आडवाटेने भीमाशंकरकडे जाण्याचा प्रयत्न करत होते.
फोटो : श्रीक्षेत्र भीमाशंकरमधील पवित्र शिवलिंगावर करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट.