जेजुरी : जिल्ह्यात घरफोड्यासह दरोडा, खून करणाऱ्या दोन अट्टल सराईतांना गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळाले आहे. ही कारवाई शनिवारी सासवड येथे करण्यात आली. अजय राजू अवचिते (वय २७), गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय २७, दोघेही रा. आलेगाव पागा, ता.शिरुर) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या सराईतांवर घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे दाखल असल्याचे समोर असून त्यापैकी ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून पाच लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिवरी (ता.पुरंदर) येथे २६ मार्चला सोपान भिसे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे १४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,००० असा एकूण पाच लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढत होत होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजपुरे यांचे पथकाने तपास सुरु केला.
तपासामध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते याने केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु, फरार होण्यास अवचिते यशस्वी होत होता. खबऱ्याकडून अजय अवचिते आणि त्याचा एक साथीदार सासवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजच अवचिते आणि गणेश भोसले यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी भिवरी येथील घरफोडी केल्याची कबूलीही त्यांनी यावेळी. त्याचबरोबर घरफोडीचे अन्य ११ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ९ तोळे ४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व एक गॅस सिलिंडर असा पाच लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
विविध पोलीस ठाण्यात १८ गंभीर गुन्हे
अजय अवचिते, गणेश भोसले या दोन सराईतांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. गणेश हा अजयचा मेहुणा आहे. दोघेही बंद घरात चोरी करायचे. ज्यावेळी हे दोघे चाेरी करत असत त्यावेळी गणेश याची पत्नी सीमा ही घराबाहेर टेहळणी करायची. या जोडगोळीने बारामती, दौंड, पुरंदर, हवेली शिरुर तालुक्यात घरफाेड्या केल्या आहे. विविध ठिकाणच्या ११ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यामध्ये सासवड ४, वडगाव निंबाळकर २, शिक्रापूर १, यवत १, भिगवण १, हवेली १, दौंडमध्ये झालेल्या एका घरफोडीचा समावेश आहे.
१०जेजुरी
पोलिसांनी गजाआड केलेले अट्टल सराईत तसेच जप्त केलेला मुद्देमाल.