लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत धामणे गावात दरोडेखोरांनी दि २५/४/१७ रोजी रात्री केलेल्या मारहाणीत आई, वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. धामणे येथून सुमारे एक किलोमीटरवरील शेतात बांधलेल्या घरात मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. सदर घटनेत नथू विठोबा फाले (वय ६५), पत्नी छबाबाई (वय ६०) आणि मुलगा अत्रिनंदन (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. अत्रिनंदन यांची पत्नी तेजश्री (वय ३०) आणि मुलगी ईश्वरी (वय २) गंभीर जखमी झाल्या आहेत. अत्रिनंदन यांच्या मोठ्या मुली अंजली (वय ९) व अनुश्री (वय ७) या सुखरूप आहेत. नथू फाले यांचे शेतात घर आहे. त्यातील एका खोलीत फाले यांच्यासह छबाबाई व अत्रिनंदन; तर दुसऱ्या खोलीत तेजश्री व त्यांच्या मुली अंजली, अनुश्री व ईश्वरी झोपलेल्या होत्या. एका खोलीचा दरवाजा उचकटून दरोडेखोर चोरी करीत होते. त्यांच्या आवाजाने नथू फाले, छबाबाई व अत्रिनंदन जागे झाले. त्यांच्यावर दरोडेखोरांनी टिकाव, कुदळ व गजाने हल्ला केला. डोक्यात घाव बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश करून तेजश्री व ईश्वरी यांच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून हल्ला केला. त्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या. दागिने व इतर ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन करून तपासासाठी पोलिसांची ८ पथके नेमली होती. अत्रिनंदन फाले यांची नऊ एकर बागायती शेती व दुग्धव्यवसाय होता. त्यांचे कुटुंब आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील होते. गावातील सर्वांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते. गेल्या २० वर्षांपासून नथू फाले पंढरपूरची पायी वारी करीत होते.
धामाणे खूनप्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद
By admin | Updated: May 11, 2017 04:17 IST