आपटाळे : अपंग व्यक्तीला प्राप्तिकर खात्यात नोकरीला लावतो, असे सांगून सुमारे साडेचार लाख रुपयांना गंडविले. या प्रकरणी एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.याबाबतची हकिकत अशी : जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील रहिवासी व अपंग संघटनेचे अध्यक्ष शरद शिवराम शिंदे (वय ४०) यांना प्राप्तिकर खात्यात नोकरीला लावतो, असे सांगून गोद्रे येथील बाळासाहेब यशवंत गायकवाड यांनी सुमारे साडेचार लाख रुपयाची फसवणूक केली. गायकवाड यांनी शिंदे यांच्याकडून डिंसेबर २०१२ पासून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच, तुमच्या पैशाबाबत काळजी करू नका. माझ्या घरगुती अडचणीकरिता पैशाची गरज आहे, असे फिर्यादी शरद शिंदे यांना स्टॅम्पपेपरवर लिहून दिले. प्राप्तिकर खात्यातील नोकरीची आॅर्डर मला द्या, असा तगादा गायकवाड यांच्याकडे लावल्यानंतर आरोपीने उडवाउडवीचे उत्तर दिले.नोकरी मिळत नाही, असे दिसताच शरद शिंदे यांनी, माझे पैसे परत द्या, असा तगादा लावला. आरोपी गायकवाड यांनी शिंदे यांना चेक दिले. ते बँकेत भरल्यानंतर ते वटू शकले नाहीत. आरोपीकडून गेली दोन-तीन वर्षे पैसे मिळत नाहीत, हे लक्षात येताच अपंग संघटनेचे अध्यक्ष शरद शिंदे यांनी आज जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आरोपी बाळासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार आर. पी. हांडे करीत आहेत. (वार्ताहर)
साडेचार लाखांना अपंगाला गंडविले
By admin | Updated: January 7, 2016 01:37 IST