जेजुरी : पुरंदर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी एकूण ५५, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी एकूण ११९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय असवले यांनी दिली. शिवसेनेच्या उमेदवारांनी कालच आपले अर्ज भरले होते, आज शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि मनसेने शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज भरले. सोमवारी पुरंदर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणारांची प्रचंड गर्दी होती. स्थानिक पक्षनेत्यांनी सर्वच इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार इच्छुकांनी आपापल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरले. उमेदवारी अर्ज भरले असले, तरीही पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, याचीच चर्चा सर्वत्र होती. बंडखोरी टाळण्यासाठी किंवा इतरांकडून ऐनवेळी आपला ए/बी फॉर्म देऊन कोणाला उमेदवारी देवू नये म्हणून अधिकृत उमेदवारीसाठी मोठी गुप्तता पाळली होती. यामुळे इछुकांची दुपारी तीन वाजेपर्यंत मोठी घालमेल सुरू होती. शेवटी दुपारी तीन वाजण्यापूर्वी पाचच मिनिटे अगोदर सर्वच पक्षांकडून थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे पक्षाचे ए/बी फॉर्म दाखल केले. अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली, तर काही उमेदवार आपली अपक्ष उमेदवारी ठेवणार असल्याचे आपापल्या पक्षनेतृत्वाला सुनावत होते. पक्षनेतेही नाराजांना चुचकारण्याचे प्रयत्न करताना दिसत होते. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बेलसर - माळशिरस गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते आणि माजी जि.प. सदस्य सुदाम इंगळे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. दोघांनीही यासाठी खूप प्रयत्न चालवले होते. यात सुदाम इंगळे यांनी बाजी मारून पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवली आहे. याच गटात शिवसेनेने मनसेचे अॅड. शिवाजी कोलते यांना सेनेत प्रवेश देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शिवाजी पवार यांच्या पत्नी सौ. शालिनी पवार यांना कोळविहिरे- नीरा गटातून उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार सेनेने आयात केल्याची मोठी चर्चा होती. राष्ट्रवादी काँंग्रेसचे महादेव शेंडकर हे पंचायत समितीसाठी माळशिरस गणातून आपल्या पत्नी मीना शेंडकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाकडून उमेदवारी घेतली आहे. मनसेने केवळ स्वत:च्या बालेकिल्ल्यातील दिवे-गराडे गटात जिल्हा परिषदेची एक आणि गणातील दोन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजपाने येथे उमेदवार उभेच केले नाहीत. इतर तीनही गटांत मनसेने भाजपाला मदत केलेली आहे. मनसे व भाजपाची अधिकृत नसली तरीही अंतर्गत युती झाली असल्याचीच चर्चा होती. तरीही भाजपाला सर्व जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. शेतकरी कामगार पक्षानेही निवडणुकीपूर्वी चांगलीच हवा निर्माण केली होती.