डोर्लेवाडी : प्रतिदेहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराममहाराज बीज यात्रा उत्साहात पार पडली. सुमारे ६५ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डोर्लेवाडी येथील संत तुकाराममहाराज मंदिरात बीजेनिमित्त भव्य गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. ७) पहाटे मंदिरात विधिवत महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गाथा पारायणाची सांगता झाली. सकाळी बाळासाहेब महाराज नाळे यांचे प्रवचन झाले. लक्ष्मणमहाराज कोकाटे यांचे फुलांचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी वैकुंठगमन प्रसंगाचे वर्णन केल्यानंतर भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले दुपारी १२ वाजता ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव-तुकाराम’ असा गजर झाला आणि हजारो भाविकांनी गुलाल-पुष्पांचा वर्षाव केला. या वेळी भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी (दि. ६) रात्री टाळ-मृदंगाच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिंडी मिरवणूक काढण्यात आली. बारामती पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. (वार्ताहर) ४सुरेशमहाराज साठे, राजेंद्रमहाराज फरांदे, महादेवमहाराज देलवडीकर, संजयमहाराज वेळूकर, श्रीहरीमहाराज यादव यांची कीर्तने झाली. शैलजामहाराज यादव यांनी गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व केले. ग्रामपंचायतीकडून गावात स्वच्छता, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला.
प्रतिदेहूत रंगला बीजोत्सव
By admin | Updated: March 7, 2015 22:54 IST