बेल्हा : शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील शिंप्याच्या लवणमध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. ८ जानेवारी रोजी हिवरे बु. येथे एक बिबट्या जेरबंद झाला होता, तर चार दिवसांपूर्वी डिंगोरे येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला होता. याबाबतची माहिती अशी की, या ठिकाणी गेले काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य होते. या बिबट्याने अनेक पाळीव कुत्री व शेळ्या खाऊन फस्त केल्या होत्या. या भागातील लोकांना रात्रीच्या वेळी कधीही बिबट्याचे दर्शन होत होते. हा बिबट्या शिंदेवाडी, पेमदरा, व्हरंडी व चोळीचा बंधारा परिसरात नेहमी लोकांना दिसत होता. लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी ग्रामस्थ शेताकडे फिरकत नव्हते.शिंप्याचे लवण येथील सुदाम शिंदे यांच्या उसाच्या शेतात हा पिंजरा लावला होता. या परिसरात चोळीच्या बंधाऱ्याचे भरपूर पाणी आहे. त्या ठिकाणी असलेल्या कपारीमध्ये बिबट्याचे वास्तव्य (लपण) असल्याचे लोकांनी सांगितले. आज पहाटे पिंजऱ्यात एक-तीन वर्षे वयाची मादी अडकली. तिला पकडण्यासाठी शेजारी शेळी ठेवण्यात आली होती. अजूनही या ठिकाणी दोन बिबटे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील बेलकर व सुनील दाते यांनी दिली. (वार्ताहर)डिंगोरेत मृतावस्थेत४तीन दिवसांपूर्वीच डिंगोरे गावच्या हद्दीत मराडवाडी येथे एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घटली. बबन बुधा पारधी याच्या शेतातील ओढ्याजवळ तो मृतावस्थेत आढळला. सदर बिबट्या १४ वर्षांचा होता. त्याचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचा अंदाज आहे.हिवरेतही पिंजऱ्यात अडकला४हिवरे बु. (ता.जुन्नर) येथे ८ जानेवारीला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. हिवरे बु., ओझर, शिरोली बु., शिरोली खुर्द, धालेवाडी, भोरवाडी या परिसरात बिबट्याची मोठी दहशत होती. मेंढरू खाण्यास तेथे आला आणि पिंजऱ्यात अडकला.
आणखी एक बिबट्या जेरबंद
By admin | Updated: January 22, 2015 00:52 IST