निमगाव केतकी : बँकेत पगार काढण्यासाठी गेलेल्या केतकेश्वर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये जादा आले. हे समजल्यानंतर दोघांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जावून जादा आलेले पैसे परत केले. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले. श्री केतकेश्वर विद्यालयातील गणेश राजेंद्र गोरे व आबाजी महादेव भोसले असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. हे दोघे बुधवारी (दि. १५) विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार आणण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमगाव शाखेमध्ये गेले होते. त्यांना पगाराबरोबर वीस हजार रुपय जादा आले होते. हे गोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेच्या निमगाव शाखेतील ब्रँच मॅनेजर खटके व शाखाअधिकारी माने यांच्याकडे जाऊन पगाराबरोबर ज्यादा आलेली वीस हजार रुपये ही रक्कम प्रामाणिकपणे परत केली.त्यांच्या या प्रामाणिक पणामुळे बँकेतील सर्व कर्मचारी यांनी श्री केतकेश्वर विद्यालयात येऊन सेवक गणेश गोरे आणि आबा भोसले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या सेवकांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतूक केले. (वार्ताहर)
बँकेतून जादा आलेली रक्कम केली परत
By admin | Updated: February 17, 2017 04:36 IST