पिंपरी : आकुर्डीत एका वसतिगृहात राहणाऱ्या रणजित चांडे (वय २३, रा. मूळ गाव पिंपळे, बारामती) या विद्यार्थ्याने खोलीतील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. आकुर्डीतील कॉलेज आॅफ इंजिनिअंरिंगमध्ये रणजित मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारी रात्री विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली जात असताना, तो राहत असलेल्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. अन्य विद्यार्थ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर तो खोलीतील छताला लटकत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. त्या वेळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली काढला. विच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. पाचव्या सेमिस्टरमध्ये त्याला चांगले गुण मिळाले होते. तो अभ्यासात हुशार होता. परंतु, विद्यार्थी तसेच मित्रांमध्ये फारसा मिसळत नव्हता. २०१३पासून तो या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पहिल्या वर्षी त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला. दुसऱ्या वर्षी २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मात्र वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने त्याला एक वर्ष बाहेर काढावे लागले. या वर्षी २०१६ला त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. (प्रतिनिधी)
आकुर्डीत विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By admin | Updated: May 25, 2016 04:41 IST