ऑनलाइन लोकमत
भोसरी, दि. 30- स्थानिक गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातुन भोसरीत २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला होता. हा खून ज्या टोळीने केला, त्या टोळीत विकास माळी याचाही सहभाग होता.अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शनिवारी भोसरी गव्हाणे वस्ती येथे विकासचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले असून विकासच्या खुनातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रमुख सूत्रधार मल्लेश कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोसरीत अक्षय काटे याचा खून झाला. या खूनातील आरोपींमध्ये आरोपी विकासचा सहभाग होता. अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात पाठवले होते. काही महिन्यांपुर्वीच सुधारगृहातुन तो बाहेर आला होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने विकासला धारदार शस्त्राचे वार करून संपविण्यात आले. नुकत्याच झालेल्या या खून प्रकरणात मल्लेश कोळी, शांताराम वाघमारे, शिवमप्रसाद, प्रशांत, अनिकेत उर्फ अंड्या,श्रीकांत या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे सर्व आरोपी भोसरीतील राहणारे आहेत.त्यातील आणखी एक आरोपी ज्ञानेश्वर लांडगे हा येरवडा तुरुंगात आहे. विकास माळीचे अक्षय काटेच्या खून प्रकरणानंतर वर्चस्व वाढले आहे.गुन्हेगारी वर्चस्व वाढल्यास आपल्या टोळीला जड जावू शकते. हे लक्षात घेऊन विकासच्या विरोधातील टोळीने त्याला संपविण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर लांडगे तुरूंगातुन बाहेर येण्यापुर्वीच त्याच्या या टोळीने विकासचा गेम केला. खुनाचा बदला खून अशा स्वरूपाची ही भोसरीत घडलेली घटना आहे.
भोसरीत स्थानिक गुंडामध्ये वर्चस्ववाद असल्याचे या घटनेच्या माध्यमातुन पुढे आले आहे. महापालिका निवडणुक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.