पुणे : स्मार्ट पुण्यासाठीचे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ३पर्यायी जागांपैकी २ जागा खेड तालुक्यात व एक जागा खेडलगतच्या शिरूर तालुक्यातील आहे. सध्या खेड, चाकण, तळेगाव आणि रांजणगाव एमआयडीसीची गरज लक्षात घेता केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत रविवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीत विमानतळासाठी खेड तालुक्यातील जागेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून जागेची पाहणी करण्यात येणार आहे.पुणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या फॉक्सकॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज प्रचंड वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता गडकरी यांनी पुण्याच्या विमानतळासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९९७ मध्ये हे विमानतळ राजगुरुनगरपासून जवळ असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने या जागेचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्वे करण्यात आला.या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा अभिप्राय एअरपोर्ट अॅनॉरिटी आॅफ इंडियाने दिला. त्यामुळे पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू झाला.तांत्रिक समितीचा अभिप्रायकडूस-पाईट ही जागा विमानतळासाठी योग्य असलेल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु, येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु या जागेसंदर्भात अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.शासनाने खेड व चाकणशिवाय अन्य जागांचा पर्याय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पुणे जिल्ह्यासह आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने विमानतळाची गरज लक्षात घेता प्रशासनाने खेड तालुक्यातीलच कडूस-पाईट आणि दावडी परिसरातील सेझचा प्र्रस्तावच नव्याने सादर केला आहे.शिरूर तालुक्यातील जागांची एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर केला आहे. याबाबत नितीन गडकरी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
विमानतळ खेडलाच
By admin | Updated: October 25, 2015 03:48 IST